3 वर्षे कोमात, अखेर राजकुमारींची प्राणज्योत मालवली

‘योगदान कायम स्मरणात राहील’; भारताची श्रद्धांजली

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
बँकॉक,
bajrakitiyabha-narendradebyawati : थायलंडच्या राजघराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजा महा वजिरालोंगकॉर्न यांच्या ज्येष्ठ कन्या आणि समाजसेवा व कायदेविषयक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजकुमारी बज्राकितियाभा नरेंद्रदेब्यावती यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले. त्या गेल्या तीन वर्षांपासून कोमामध्ये होत्या. ११ जून २०२६ रोजी बँकॉकमधील किंग चुलालोंगकॉर्न मेमोरियल रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
 
 
 
bajrakitiyabha-narendradebyawati
 
राजकुमारींना डिसेंबर २०२२ मध्ये हृदयविकाराचा गंभीर झटका आला होता. नाखोन रात्चासिमा प्रांतात आपल्या पाळीव कुत्र्यासोबत प्रशिक्षण घेत असताना त्या अचानक कोसळल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे त्यांच्या प्रकृतीत अनेक गुंतागुंत निर्माण झाल्या. मोठ्या आतड्याला झालेल्या संसर्गामुळे अनेक अवयवांवर परिणाम झाला आणि त्या कोमामध्ये गेल्या.
 
डॉक्टरांनी गेली तीन वर्षे त्यांच्यावर सातत्याने उपचार केले. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. गेल्या काही महिन्यांत त्यांची तब्येत अधिक खालावली होती. अखेर गुरुवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
 
 
 
 
 
राजकुमारी बज्राकितियाभा या केवळ राजघराण्याच्या सदस्य नव्हत्या, तर समाजसेवा, महिला हक्क आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणांसाठीही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. महिला कैद्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी ‘कमलुंगजाई’ हा उपक्रम सुरू केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांनी २०१० मध्ये महिला कैद्यांच्या हक्कांबाबतचे ‘बँकॉक नियम’ स्वीकारले होते.
 
त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये थायलंडच्या प्रतिनिधीमंडळात काम केले. तसेच २०१२ ते २०१४ या काळात ऑस्ट्रियामध्ये थायलंडच्या राजदूतपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. २०१७ मध्ये त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या अमली पदार्थ व गुन्हे प्रतिबंधक कार्यालयाच्या (UNODC) सदिच्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली होती.
 
 
 
 
त्यांच्या निधनानंतर भारतानेही शोक व्यक्त केला आहे. बँकॉकमधील भारतीय दूतावासाने राजघराणे आणि थायलंडच्या जनतेप्रती संवेदना व्यक्त करत राजकुमारींचे सार्वजनिक सेवा आणि राजनैतिक क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील, असे म्हटले आहे.
 
राजकुमारींच्या निधनानंतर बँकॉकमध्ये शोककळा पसरली असून, किंग चुलालोंगकॉर्न मेमोरियल रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली. राजेशाही परंपरेनुसार त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून, त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ग्रँड पॅलेसमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याची आणि सेवाभावी जीवनाची आठवण थायलंडमध्ये दीर्घकाळ जपली जाईल.