भारत भगत यांच्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल नाही

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
भर उन्हात विना मंडप आमरण उपोषण सुरू
 
कारंजा लाड, 
Bharat Bhagat's hunger strike शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी औरंगपूर येथील शेतकरी नेते भारत पुरुषोत्तम भगत यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण दुसर्‍या दिवशीही कायम असून, तापत्या उन्हात विना मंडप सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
 
juposdldi
 
गुरुवार, ११ जूनपासून सुरू झालेल्या या उपोषणात शेतकरी व शेतमजुरांच्या मूलभूत प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उपोषणस्थळी कोणत्याही प्रकारची सावली किंवा मंडपाची व्यवस्था नसल्याने भारत भगत यांना सुमारे ४० अंश सेल्सिअस तापमानात उघड्यावर बसून आंदोलन करावे लागत आहे. दुसर्‍या दिवशीही प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. सततची नापिकी, वाढते कर्जबाजारीपण, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी व शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे भारत भगत यांनी सांगितले. उपोषणासाठी मंडपाची व्यवस्था न केल्यामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
 
 
 
Bharat Bhagat's hunger strike  शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक संकटासारख्या गंभीर विषयांवर सरकार उदासीन असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असल्याची भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, गुरुवारी प्रदीप वानखडे, अण्णा सुरजुसे, विनोद नांदगावळी यांच्यासह अनेक शेतकरी आणि नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन भारत भगत यांना पाठिंबा दर्शविला. आंदोलनाची माहिती जाणून घेत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी उपस्थितांनी केली. तालुयातील शेतकरी व शेतमजुरांचे लक्ष आता या आंदोलनाकडे लागले असून, प्रशासन आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढते की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार भारत भगत यांनी व्यक्त केला असून, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शयता वर्तविली जात आहे.
 
 

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकर्‍यांना प्रति एकर ४० हजार रुपयांची आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी, घरगुती वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज, तसेच सिबिल स्कोअरची अट रद्द करून शेतकरी व शेतमजुरांना सुलभ कर्जपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.