६० हजारांचा ऐवज लंपास
मालेगांव,
Burglary at Mangul Jhanak तालुयातील शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या मांगुळ झनक येथे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामकोर आत्माराम लेमडे वय ७५, राहणार मांगुळ झनक, तालुका रिसोड यांच्या घरात ११ जूनच्या रात्री उशिरा ते १२ जूनच्या पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून प्रवेश केला. घरात ठेवलेली गळ्यातील सोन्याची १०० गहू मण्यांची पोत, प्रत्येकी ४ ग्रॅम वजनाचे दोन डोरले तसेच कापडी पिशवीत ठेवलेली २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच फिर्यादी यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २५९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब पोकॉ विष्णू बोंडे करीत असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.