मुंबई
devendra fadnavis देशातील विविध प्रादेशिक आणि घटक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर प्रतिक्रिया देत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर अनेक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे आवाहन केल्यानंतर या चर्चांना वेग आला होता.
मोदी सरकारच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” अशी टिप्पणी करत त्यांनी राऊत हे ना काँग्रेसचे आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेसचे, तरीही ते अशा विषयांवर भाष्य करत असल्याचा टोला लगावला.
विलिनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, संबंधित पक्षांचे नेते राजकीयदृष्ट्या परिपक्व असून ते बुडत्या बोटीमध्ये पाय ठेवणार नाहीत. काँग्रेस हे बुडते जहाज असल्याचे सांगत त्यांनी अशा पक्षांचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले. तथापि, राजकारणात कोणतीही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. जर असे विलिनीकरण झालेच, तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल, कारण विरोधी पक्षांची राजकीय जागा कमी झाल्यास त्यातून भाजपला अधिक संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
यावेळी फडणवीस devendra fadnavis यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक करत विविध विकासकामांचा आढावा घेतला. या काळात देशात सर्वांगीण आणि व्यापक बदल घडल्याचा दावा त्यांनी केला. ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत देशातील तीन कोटी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून आगामी काळात हा आकडा सहा कोटींवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.मोदी सरकारच्या कार्यकाळावर भाष्य करताना फडणवीस यांनी केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा दावा केला. गेल्या बारा वर्षांत सरकारने पारदर्शक कारभार केला असून सुमारे २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत, असे ते म्हणाले. गरीब कुटुंबांना अन्नसुरक्षा मिळावी यासाठी विविध अन्नधान्य योजनाही सुरू ठेवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.राज्यातील कृषी परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पेरणी करण्याचे आवाहन केले. जनावरांसाठी वैरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकार पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या विषयावर बोलताना निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सोयाबीन आणि कापूस या पारंपरिक पिकांच्या पॅटर्नमधून शेतकऱ्यांनी बाहेर पडून पर्यायी पिकांकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कर्जमाफीसंदर्भात सरकारने devendra fadnavis उपसमितीची स्थापना केली असून आतापर्यंत सुमारे ४० लाख शेतकऱ्यांना कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया न करता कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अर्थखात्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, “आज तरी अर्थखाते माझ्याकडेच आहे,” असे म्हणत त्यांनी सूचक टिप्पणी केली.