विलेमस्टॅड (कुरासाओ),
fifa-world-cup-2026 : कॅरिबियन समुद्रातील छोट्याशा कुरासाओ देशाने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये प्रवेश करून इतिहास रचला आहे. अवघी सुमारे १.५६ लाख लोकसंख्या असलेला कुरासाओ हा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा जगातील सर्वात लहान देश ठरला आहे.
नेदरलँड्सच्या अधिपत्याखालील हा द्वीपदेश यापूर्वी कधीही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला नव्हता. मात्र यंदा शानदार कामगिरी करत त्यांनी प्रथमच विश्वचषकाचे तिकीट मिळवले. पात्रता फेरीत कुरासाओने बलाढ्य संघांना कडवी टक्कर देत आपले स्थान निश्चित केले.
कुरासाओची लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्रफळ दोन्ही अत्यंत कमी आहे. त्यामुळे हा देश विश्वचषकात पोहोचल्याने जगभरातील फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याआधी २०१८ मध्ये आइसलँड हा सर्वात कमी लोकसंख्येचा विश्वचषक खेळणारा देश होता, मात्र कुरासाओने तो विक्रमही मागे टाकला आहे.
डच प्रशिक्षक डिक ॲडव्होकाट यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने उल्लेखनीय प्रगती केली. संघातील अनेक खेळाडू नेदरलँड्समध्ये वाढलेले असून त्यांचे मूळ कुरासाओशी जोडलेले आहे. या खेळाडूंच्या अनुभवाचा संघाला मोठा फायदा झाला. फिफा विश्वचषक २०२६ मध्ये कुरासाओचा हा पहिलाच सहभाग असणार असून, छोट्या देशाच्या या मोठ्या यशाची चर्चा सध्या जगभरात होत आहे.