मुंबई,
Dinyar Tirandaz हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि आपल्या विनोदबुद्धी तसेच पारसी व्यक्तिरेखांच्या प्रभावी सादरीकरणासाठी ओळखले जाणारे अभिनेते दिनयार तीरंदाज यांचे गुरुवारी मुंबई येथे निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच बॉलिवूडसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दिनयार तीरंदाज यांच्या निधनाची माहिती ‘पारसी झोरोस्ट्रियन वर्ल्डवाइड – हैदराबाद’ या सोशल मीडिया पेजद्वारे देण्यात आली. या पोस्टमध्ये दिनयार तीरंदाज यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले असून मुंबईतील वाडिया बंगली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. सोशल मीडियावर ही बातमी वेगाने पसरल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले.
मात्र, त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबीयांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील अनेकांना धक्का बसला आहे.
अभिनयाची छाप सोडली
दिनयार तीरंदाज यांनी आपल्या Dinyar Tirandaz अभिनय कारकिर्दीत अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. १९८४ मध्ये दिग्दर्शक रमेश तलवार यांच्या ‘दुनिया’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि विविध प्रकारच्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.शाहरुख खान अभिनीत ‘चलते चलते’ या चित्रपटातील ‘रुस्तम’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली होती. याशिवाय ‘हॅलो ब्रदर’, ‘मैंने प्यार क्यों किया?’, ‘दिल है के मानता नहीं’, ‘क्या कहना’, ‘अलबेला’, ‘दरार’ आणि ‘कमाल धमाल मालामाल’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. विशेषतः विनोदी भूमिकांमधील त्यांचा सहज अभिनय आणि पारसी पात्रांचे वास्तवदर्शी सादरीकरण यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.