शेगाव,
FDA action against Shegaon Kachori राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात राज्यभरात मोठी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक छापा टाकून तपासणी केली आहे. शेगाव हे देशभरातील भाविकांचे प्रमुख धार्मिक ठिकाण असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक भेट देतात. अशा ठिकाणी विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने अधिकाऱ्यांनी जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांमध्ये भेसळ किंवा निकृष्ट दर्जाचे घटक आढळल्यास संबंधित कचोरी सेंटरवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ही कारवाई निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.