नवी दिल्ली,
Female judge love on Tinder ऑनलाइन डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकरणाची भर पडली आहे. हरियाणातील एका महिला न्यायाधीशांना प्रेमसंबंध आणि गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ५२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची दखल घेत दिल्लीतील न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावत तपासातील अनेक गंभीर बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.माहितीनुसार, डेटिंग अॅपवर झालेल्या ओळखीनंतर एका व्यक्तीने स्वतःला सरकारी गुप्त विभागातील अधिकारी असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढली आणि आरोपीने मोठ्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवत विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले.

विश्वासाच्या नात्यातून संबंधित महिलेने विविध खात्यांमध्ये मोठी रक्कम हस्तांतरित केली. मात्र, कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तक्रार दाखल करण्याची पद्धत. फसवणूक झाल्यानंतर संबंधित महिला न्यायाधीशांनी स्वतःच्या नावाने तक्रार नोंदवली नसल्याचे समोर आले. त्याऐवजी त्यांच्या घरातील मदतनीस महिलेच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. बँक व्यवहारांची तपासणी करताना बहुतांश आर्थिक व्यवहार हे न्यायाधीशांच्या खात्यांमधून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, अशा प्रकारच्या फसवणुकीत पीडित व्यक्तींना लाज किंवा संकोच वाटू शकतो. मात्र त्यामुळे तपास यंत्रणांपासून महत्त्वाची माहिती लपवणे योग्य ठरत नाही. न्यायालयाने संबंधित महिला न्यायाधीशांना डेटिंग अॅपवरील संवाद, व्हॉट्सअॅप चॅट आणि आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती तपास अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.तपासादरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे अद्याप समोर आले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. दुसरीकडे, आरोपीनेही स्वतःकडील काही माहिती आणि संवाद लपवून ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून अनेक महत्त्वाच्या बाबी पुढील चौकशीत उघड होण्याची शक्यता आहे.या घटनेमुळे ऑनलाइन डेटिंग अॅप्सद्वारे होणाऱ्या ‘रोमान्स स्कॅम’ आणि ‘हनी ट्रॅप’च्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.