दिल्लीतील निवासी इमारतीत आग; तीन ठार

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Fire in residential building in Delhi राजधानी दिल्लीतील तुघलकाबाद एक्स्टेन्शन परिसरात शुक्रवारी पहाटे एका निवासी इमारतीत भीषण आग लागून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आठ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीमुळे संपूर्ण इमारतीत धुराचे साम्राज्य पसरल्याने रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेदोनच्या सुमारास तुघलकाबादमधील एका बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली. आग वेगाने भडकत नसली तरी तिचा दाट धूर काही क्षणांतच वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे अनेक रहिवासी आपल्या घरांत अडकून पडले. जीव वाचवण्यासाठी काहींनी घरातील साड्या व कापडांचा आधार घेत दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.
 
 

dilhi
 
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अरुंद रस्ते आणि गर्दीच्या वस्तीमुळे बचावकार्य करताना अडचणी निर्माण झाल्या, तरीही जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. बचावलेल्या आठ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यामध्ये महिलांचाही समावेश आहे.प्राथमिक तपासात इमारतीच्या तळमजल्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधून आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. धुरामुळे गुदमरून दोन महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पहाटे सव्वातीनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि त्यानंतर शोधमोहीम राबवून आग पूर्णपणे विझवण्यात आली. दरम्यान, दिल्लीत अलीकडच्या काळात लागोपाठ आग लागण्याच्या घटना समोर येत असल्याने अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवासी इमारतींमध्ये अग्निसुरक्षा साधने अनिवार्य करण्याबाबत प्रशासन गंभीरपणे विचार करत असून भविष्यात कमी उंचीच्या इमारतींमध्येही स्मोक डिटेक्टर, अग्निशामक यंत्रे आणि इतर सुरक्षा उपाय सक्तीचे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.