गंगापूर धरणात तीन भावंडांसह चौघांचा बुडून मृत्यू

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
नाशिक,
Four drown in Gangapur Dam नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन सख्खे भाऊ आणि एका तरुणीचा समावेश असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील गोतर्णे कुटुंबातील गणेश गोतर्णे, साहिल गोतर्णे आणि निखिल गोतर्णे हे तिघे सख्खे भाऊ तसेच तळेगाव अंजनेरी येथील मयुरी जाधव हे चौघे गंगापूर धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. धरणाच्या सांडव्याजवळ पाण्यात उतरून ते पोहत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
 

Gangapur Dam 
 
पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने एक जण अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतरही पाण्याच्या प्रवाहात अडकले. या गोंधळात एका तरुणाने एका तरुणीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले, मात्र उर्वरित तिघे आणि मयुरी जाधव खोल पाण्यात बुडाले.घटनेनंतर वाचलेला तरुण तातडीने गावात परत जाऊन मदत मागवली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अधिकृत पथके येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम राबवत चारही मृतदेह बाहेर काढले. जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सावरगाव आणि परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक धरण परिसरात जमा झाले होते. सर्व मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. गंगापूर धरण हे नाशिक परिसरातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असून, दररोज हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, या घटनेमुळे धरण परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.