दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘जेईई, नीट’चे मोफत प्रशिक्षण
जिल्हाधिकारी विकास मीना यांची संकल्पना
यवतमाळ,
Free coaching for JEE and NEET जिल्ह्यातील ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना जेईई व एनईईटी (नीट) परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘सुपर 50’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 50 निवडक विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी दोन वर्षांचे संपूर्ण मोफत निवासी प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘सुपर 50’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यामधून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, निवास, भोजन व अभ्यास साहित्याचा संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जाणार आहे.
जिल्ह्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षात 33 हजारांहून अधिक विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व वंचित घटकांतील आहेत. आर्थिक अडचणी व दर्जेदार मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता येत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी या ‘सुपर 50’ उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धा परीक्षेद्वारे निवड केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नागपूर, नांदेड किंवा अकोला येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये अकरावी व बारावी दरम्यान दोन वर्षांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात प्रवर्गनिहाय जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 20, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी 10 आणि खुला व ओबीसी प्रवर्गासाठी 10 अशा एकूण 50 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
कोणासाठी..?
विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्याचा मूळ रहिवासी असावा. 2026 मध्ये झालेल्या दहावी मंडळ परीक्षेत किमान 65 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. निवड चाचणी परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून 100 गुणांची बहुपर्यायी परीक्षा असेल. परीक्षेत भौतिकशास्त्र (20 गुण), रसायनशास्त्र (20 गुण), गणित (25 गुण), जीवशास्त्र (20 गुण) व इंग्रजी (15 गुण) या विषयांचा समावेश असेल. परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी राहील.
अर्ज प्रक्रिया सुरू
जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘सुपर 50’ उपक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांना शनिवार, 20 जूनच्या संध्याकाळी 6.15 वाजेपर्यंत गुगल फॉर्म व क्यूआर कोडद्वारे अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर पुढील संपर्क नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व ई-मेलवर केला जाईल. कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे अर्ज रद्द होऊ शकतो. अंतिम निर्णय जिल्हास्तरीय समितीकडे असेल. या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड परीक्षा 25 जून रोजी होणार आहे.