- केवळ 10 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढण्याची मुभा : शेतकर्यांमध्ये संताप
गोंदिया,
Gondia District Central Cooperative Bank शेतकर्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (जीडीसीसी) सध्या रोकड टंचाई निर्माण झाली असून बँकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकर्यांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँकेत पैसे काढण्यासाठी येणार्या शेतकर्यांना केवळ 2 हजार ते 10 हजार रुपये इतकीच रक्कम दिली जात असल्याने शेतकर्यांमध्ये बँक प्रशासनाविरोधात नाराजी आणि संताप वाढत आहे.
Gondia District Central Cooperative Bank खरीप हंगामाची सुरुवात झाल्याने शेतकर्यांना बियाणे, खते व शेतीच्या इतर कामांसाठी पैशांची गरज आहे. मात्र खात्यात कर्जाची रक्कम जमा असूनही ती पूर्णपणे काढता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर याप्रकाराने शेतकर्यांवर खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतकर्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज दिले जाते. एकट्या गोरेगाव शाखेत सुमारे 25 हजार ग्राहक असून यावर्षी 2 हजार 438 शेतकर्यांच्या खात्यात 17 कोटी 7 लाख 32 हजार रुपयांचे पीककर्ज जमा करण्यात आले आहे. मात्र, कर्जाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर शेतकर्यांना अत्यल्प रोकड दिली जात असल्याने शेतकर्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. दरम्यान, रोकड टंचाईमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडले असून बँक प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पुरेशी रोकड उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
गरज 90 लाखाची मिळतात फक्त 20 लाख
गोरेगावचे शाखा व्यवस्थापक एम.ए. मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सहकारी बँक, रिजर्व बँक आदी राष्ट्रीयकृत बँकेकडून मुख्य शाखा व मुख्य शाखेकडून सर्व शाखांना रोकडे पुरविण्यात येते. मात्र सदर राष्ट्रीयकृत बँकांकडून मुख्य शाखेला अपेक्षीत रोकड पुरवठा होत नाही. परिणामी शाखेला दररोज सुमारे 80 ते 90 लाख रुपयांच्या रोकडची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ 15 ते 20 लाख रुपयेच उपलब्ध होत आहेत.