संत्रा उत्पादक शेतकरी संकटात
मोर्शी,
hailstorm hits morshi taluka मोर्शी तालुक्यात १२ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या सोसाट्याच्या वार्यासह पाऊस व जोरदार गारपीट झाल्यामुळे तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः हिवरखेड महसूल मंडळातील दापोरी, डोंगर, यावली, घोडदेव, सालबर्डी, पाळा, मायवाडी, भाईपूर यासह अनेक गावांमध्ये गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला असून संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अनेक ठिकाणी संत्र्यांची फळगळ झाली असून झाडांवरील फळांना गंभीर इजा पोहोचली आहे. काही भागांत गारपिटीमुळे झाडांच्या फांद्या तुटल्या असून आगामी हंगामावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हजारो रुपयांचा खर्च करून संत्रा बागांचे संगोपन करणार्या शेतकर्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. अर्धा तास आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.