मनू भाकरला घडवणारे जसपाल राणा यांचे निधन

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Jaspal Rana passes away भारतीय नेमबाजी क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि अनेक आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंचे मार्गदर्शक जसपाल राणा यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडा विश्वात शोककळा पसरली असून नेमबाजी क्षेत्राने एक अनुभवी प्रशिक्षक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच परदेशातील स्पर्धेतून भारतात परतताना विमानप्रवासादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती भारतीय नेमबाजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
 
 
Jaspal Rana passes away
 
जसपाल राणा यांनी प्रशिक्षक म्हणून भारतीय नेमबाजीला नवे आयाम दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली. ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकरसह सौरभ चौधरी, अनिश भानवाला आणि चिंकी यादव यांसारख्या खेळाडूंच्या यशामागे त्यांचे मोलाचे योगदान मानले जाते. युवा नेमबाजांना घडविण्यात आणि भारतीय संघाची कामगिरी उंचावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.प्रशिक्षक म्हणून मिळालेल्या यशाइतकीच त्यांची खेळाडू म्हणूनची कारकीर्दही उल्लेखनीय होती. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्यांनी भारतासाठी अनेक पदके जिंकली. नेमबाजीतील सातत्यपूर्ण यशामुळे ते देशातील सर्वाधिक यशस्वी नेमबाजांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले होते.