वंचित च्या राज्य सदस्या किरण गिर्हे यांची मागणी
वाशीम,
jijau sabhagruh एकेकाळी वाशीम जिल्ह्याचा मानबिंदू असलेले जिल्हा परिषदेच्या जुन्या परिसरातील भव्य ‘जिजाऊ सभागृह’ आजघडीला धुळखात पडले आहे. १९९८ ते २००० या काळात उभारलेले हे सभागृह जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक वास्तूंपैकी एक होते. येथे शासकीय बैठका, राजकीय मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या विवाह सोहळ्यांनी नेहमीच गर्दी असायची. ज्या जिजाऊ ने महाराष्ट्र घडवला आज त्याच जिजाऊ च्या नावाने बंद असलेली ओसाड पडलेली इमारत पाहून पुन्हा नव्याने दिमाखात उभी राहावी नवचैत्यन्य पुन्हा या इमारती मध्ये यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश सदस्या किरण गिर्हे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
जिजाऊ सभागृह हे केवळ इमारत नाही, तर वाशीमच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा भाग आहे. येथे होणार्या कार्यक्रमांमुळे अनेक गरजू कुटुंबांना स्वस्तात लग्नाचा हॉल मिळायचा. आज ही इमारत धुळखात पडली आहे. याकडे जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. सभागृहाची आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता, रंगरंगोटी, फर्निचरची देखभाल आणि परिसराचे सुशोभीकरण केल्यानंतर ते पुन्हा कार्यान्वित करावे. ते भाडे तत्त्वावर उपलब्ध करून दिल्यास जिल्हा परिषदेला चांगला महसूल मिळेल आणि तो निधी विकासकामांसाठी वापरता येईल. सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठीही याचा मोठा उपयोग होईल. आज या इमारतीच्या परिसरात मोकाट जनावरे, भटके कुत्रे यांचा वावर वाढला आहे. काही असामाजिक तत्वे जुगार, वरली मटका आणि दारू पिऊन गोंधळ घालत आहेत. शासनाचा कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारलेली ही ऐतिहासिक वास्तू निरुपयोगी होत चालली आहे.
jijau sabhagruh या संदर्भात किरण गिर्हे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा किरण कोवे यांना लेखी निवेदन दिले. निवेदनाचा सकारात्मक विचार करून कोवे यांनी येत्या १५ दिवसांत सभागृहाचे स्ट्रचरल ऑडिट करण्याचे, आवश्यक निधी मंजूर करून दुरुस्तीची कार्यवाही करण्याचे आणि सभागृह पुन्हा जनतेच्या उपयोगासाठी उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन दिले. आता जिल्हा प्रशासन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून या ऐतिहासिक वास्तूला नवसंजीवनी देणार याकडे संबंध जिल्हाचे लक्ष लागले आहे. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सचिन गटलेवार देखील उपस्थित होते.