काँग्रेसला प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाची प्रतीक्षा

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
अमरावती विधान परिषद निवडणूक
 
 
अमरावती, 
Legislative Council Election विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीला अवघे सहा दिवस शिल्लक असताना काँग्रेसला प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. एक वेगळाच प्रसंग काँग्रेससमोर या निवडणुकीतून उभा झाला आहे. सद्यस्थितीत काँग्रेसचा प्रचार ठप्प पडला आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे नागपूर येथील रुग्णालयात आहेत. त्यांच्यात आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैकी झडत असून कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी गुरूवारी एक बैठक घेऊन त्यांचे मत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कळविले आहे. आता प्रदेशाध्यक्ष या निवडणुकीच्या संदर्भात काय निर्णय घेतात, याची प्रतीक्षा त्यांना आहे.
 
 
elsc
 
खासदार बळवंत वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर विलास इंगोले आदी उपस्थित होते. हर्षजीत देशमुख हे रुग्णालयात दाखल झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षजीत देशमुख यांना रूग्णालयातून शनिवारी सुटी मिळणार असून ते रविवारी प्रचारात सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण, त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
 
 
वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा?
काँग्रेसचे उमेदवार प्रत्यक्ष प्रचार करण्याच्या स्थितीत नसल्याने काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा द्यावा, या विषयावर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.