सांगलीत घरात घुसून १३ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
सांगली,
Man shot dead in Sangli सांगली शहरातील अभयनगर परिसर गुरुवारी सायंकाळी झालेल्या धक्कादायक गोळीबाराने हादरून गेला. काही अज्ञात हल्लेखोरांनी एका घरात घुसून १३ वर्षीय मुलावर गोळीबार केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास चार ते पाच जणांचा एक गट संबंधित घरात घुसला आणि त्यांनी थेट गोळीबार केला. या हल्ल्यात अल्पवयीन वेदांत बंडगर गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घरात घुसून अल्पवयीन मुलावर झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
 
 

Man shot dead in Sangli 
 
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.प्राथमिक तपासात जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेमुळे सांगलीतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भरवस्तीत घरात घुसून झालेल्या गोळीबाराने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.