वाई गौळमधील अनेक घरांना धोका
मानोरा,
Manora: Mahavitaran Company तालुयातील तीर्थक्षेत्र अमरगड (वाई गौळ) गावात पोहरादेवी सब स्टेशनवरून येणार्या लघुदाब विज पुरवठा तारा धोकादायक स्थितीत आहेत. अनेक घरांच्या छतावरून या तारा अत्यंत कमी उंचीवरून गेल्या आहेत. स्थानिक युवराज शिंदे यांच्या राहत्या घराच्या टेरेसच्या अगदी जवळून वीजवाहक तारा जात आहेत. त्यांनी महावितरण कंपनी प्रशासनाला सदरील धोकादायक तारा कंपनी प्रशासनाच्या पद्धतीने सुरक्षित करण्याची अनेक वेळा तोंडी मागणी केली ज्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
घरावरून अगदी जवळून गेलेले या तारांमुळे घरातील सदस्य, लहान मुले व बांधकाम करणार्या मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात किंवा वादळात तारा तुटून पडण्याची किंवा स्पर्श होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जीवित वा शारीरिक हानी होण्याआधी महावितरण प्रशासनाने या कमी उंचीच्या तारा उंच कराव्यात किंवा योग्य पद्धतीने सुरक्षित कराव्यात अशी मागणी वाई गौळ मधील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.