महाडच्या ऐतिहासिक जलक्रांतीचा रंगमंचावर जागर

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
- ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटीकेच्या पोस्टरचे मुंबईत लोकार्पण

अर्जुनी मोरगाव, 
MLA Rajkumar Badole एकेकाळी समाजातील वंचित घटकांना सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी पिण्याचाही अधिकार नाकारला जात होता. माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून देणारे आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारे पाण्याने पेटला वणवा हे ऐतिहासिक मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर येत असून, त्याच्या पोस्टरचे भव्य लोकार्पण मुंबईतील दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
 
 
Rajk umar
 
या नाटकाचे लेखन आमदार राजकुमार बडोले यांनी केले आहे. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन म्हणून हे नाटक साकारण्यात आले आहे. महाडचा संघर्ष हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर समानता, स्वाभिमान आणि मानवी हक्कांसाठीचा लढा होता. हजारो बहिष्कृत बांधवांसह बाबासाहेबांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून सामाजिक विषमतेविरुद्ध ऐतिहासिक लढ्याची ठिणगी पेटवली होती. अनेक अभ्यासक या आंदोलनाची तुलना थेट फ्रेंच राज्यक्रांतीशी करतात. ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते 1927 चा महाड सत्याग्रह आणि आजची पिढी यांना एकाच सूत्रात बांधते. शंभर वर्षांपूर्वीच्या संघर्षाचे आजच्या समाजातील महत्त्व आणि त्याची समकालीनता अधोरेखित करण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे. युगंधर क्रिएशन्स एल.एल.पी. प्रस्तुत या नाटकाची निर्मिती शारदा राजकुमार बडोले यांनी केली असून गणेश कृ. मोडक हे सहनिर्माते आहेत. नाटकाचे दिग्दर्शन प्रशांत निगडे, संगीत मंदार देशपांडे यांनी दिले असून डॉ. संदेश वाघ (इतिहास विभाग, मुंबई विद्यापीठ) यांनी ऐतिहासिक संशोधन सल्लागार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या नाटकात सशांक पांचाळ, अजित रांजणे, मयुरेश मढवी, अमोल जाधव, प्रेम जेटीथोर, प्रांजल परब, सायली नंदा, राजू भिलारे, तेजस राजे, मयुरी निकम, महादेव जाधव आणि मृणाल खिस्मतवार हे कलाकार विविध भूमिका साकारत आहेत. दरम्यान, पोस्टर लोकार्पण सोहळ्यास भदंत राहुल बोधी, अभिनेता गगन मलिक, आंतरराष्ट्रीय गायक पवा, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक सचिन मून, नागसेन कांबळे, रमेश जाधव, प्रशांत शहारे, रवी गरुड, राकेश भास्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.