मुंबई,
Mumbai lakes जून महिन्याचे दहा दिवस उलटून गेले तरीही राज्यात मान्सूनचा जोरदार पाऊस अद्याप न पडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. वाढत्या उकाड्यासोबतच मुंबईकरांसमोर आता पाणीटंचाईचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील उपयुक्त पाणीसाठा गुरुवार, ११ जून रोजी सकाळपर्यंत केवळ १२.१२ टक्क्यांवर आला असून, हा साठा सुमारे महिनाभरापुरताच पुरेल, अशी माहिती समोर आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण १.७५ लाख दशलक्ष लिटर इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठ्यातील घट लक्षात घेऊन १५ मेपासूनच पालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली असून, समाधानकारक पाऊस पडेपर्यंत ही कपात कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र, वेळेत पाऊस न झाल्यास पाणीपुरवठ्यावर आणखी मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
किती साठा शिल्लक
तलावनिहाय स्थिती पाहता भातसा तलावात सर्वाधिक ४३.३६ टक्के साठा शिल्लक आहे, तर मोडक सागरमध्ये ३२.४४ टक्के पाणी आहे. तुळशी तलावात २४.६६ टक्के, मध्य वैतरणामध्ये १४.४८ टक्के, विहार तलावात ११.३३ टक्के आणि तानसा तलावात केवळ ७.१५ टक्के साठा शिल्लक आहे. सर्वात चिंताजनक स्थिती अप्पर वैतरणा तलावाची असून तेथे उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवर पोहोचला आहे.
मान्सून मुंबईत दाखल झाला Mumbai lakes असला तरी धरण क्षेत्रांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, पाणीकपातीमुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, गोवंडी, साकीनाका, मानखुर्द, वडाळा आणि परळ यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे, पावसाळा तोंडावर असतानाही मिठी नदीतील गाळ उपसण्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. नदीसफाईचे काम सुमारे ८२.९३ टक्के पूर्ण झाले असून अंतिम मुदत उलटून गेल्यानंतरही पूर्ण सफाई झालेली नाही. काही विभागांमध्ये काम प्रलंबित असल्याने सखल भागांत पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.सध्याची परिस्थिती पाहता मुंबईकरांना पुढील काही दिवस पाणीटंचाई आणि उकाड्याचा दुहेरी सामना करावा लागू शकतो. प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.