मेलबर्न,
Nikhil's entry into the Australian team भारतीय वंशाचा अष्टपैलू क्रिकेटपटू निखिल चौधरी याच्या मेहनतीला अखेर मोठे फळ मिळाले असून त्याची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघात प्रथमच निवड झाली आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी त्याच्या दारात येऊन ठेपली आहे. पंजाबमध्ये जन्मलेल्या निखिलने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात भारतातून केली होती. मात्र २०२० मध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी तो ऑस्ट्रेलियात गेला आणि त्याच काळात कोरोनामुळे जगभरातील प्रवासावर निर्बंध आले. परिणामी तो ऑस्ट्रेलियातच अडकून पडला. याच अनपेक्षित वळणाने त्याच्या आयुष्याला नवी दिशा दिली.

ऑस्ट्रेलियात राहिल्यानंतर निखिलने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आपली छाप पाडली. ग्रेड क्रिकेटपासून सुरुवात करत त्याने टास्मानिया संघात स्थान मिळवले आणि नंतर बिग बॅश लीगमधील होबार्ट हरिकेन्ससाठी सातत्यपूर्ण प्रदर्शन केले. त्याच्या अष्टपैलू खेळामुळे तो निवडकर्त्यांच्या नजरेत आला.अलीकडील देशांतर्गत हंगामात निखिलने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावतानाच पाच बळी घेण्याचा पराक्रमही त्याने केला. त्यामुळे त्याचे नाव राष्ट्रीय संघासाठी चर्चेत आले होते. अखेर त्याला बांगलादेश दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक करत राष्ट्रीय संघात त्याचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे, त्याला संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर संधी मिळाली असली तरी, त्याच्या कामगिरीच्या जोरावरच ही निवड झाल्याचे मानले जात आहे. कोरोना काळात ऑस्ट्रेलियात अडकलेला एक भारतीय युवक आता ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाचा भाग बनला आहे. त्यामुळे निखिल चौधरीचा प्रवास क्रिकेटविश्वात प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिला जात आहे.