आंतरराज्यीय टोळीतील तिघे गजाआड

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
वृद्धाची १३.८७ लाखाने ऑनलाईन फसवणूक
सायबर गुन्हेगारांची टोळी
 
अमरावती, 
Online Fraud वृद्धा १३ लाख ८७ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करणार्‍या तीन आरोपींना अमरावती पोलिसांनी नोएडा येथून अटक केली. हे तिघेही आंतराज्यीय सायबर गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक सक्करसाथ येथील ६७ वर्षीय सुधीर बालक्रिष्ण भंडारी यांनी ६ वर्षापूर्वी आदित्य बिरला फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते व त्याची पूर्ण परतफेड सुद्धा केली होती. गत ४ जानेवारी रोजी रोजी अज्ञात मोबाईलवर एका व्यक्तीने तो आदित्य बिरला फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून ३० लाख रुपयांचे कर्ज पुन्हा मंजूर झाल्याचे भंडारी यांना सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे भंडारी यांनी स्वतःचे आधारकार्ड, पॅन कार्ड व जीएसटीएन सर्टीफिकेट, एक कॅन्सल चेक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविले होते.
 
 
Online Fraud
 
कागदपत्रे पाठविल्यानंतर त्या अज्ञात इसमाने कर्ज प्रक्रियेकरिता ७५ हजार रुपये भरावे लागतील व कर्ज मंजुरीकरिता अधिकार्‍ययास पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या वेळी मोबाईलधारकांने ३० लाख रूपये लोन देण्याचे आमिष दाखवून भंडारी यांना एकूण १३ लाख ८७ हजार ७०० रुपये पाठविण्यास भाग पाडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यावर भंडारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने या प्रकरणातील आरोपी नोएडा, उत्तर प्रदेश या भागातील असल्याचे निष्पन्न केले. या गुन्ह्यातील बँक खाते नोएडा येथील असल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार, हेड कॉन्स्टेबल निखिल माहुरे, कॉन्स्टेबल अश्विन यादव व रोशन लकडे यांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले. ज्याच्या बँक खात्यावर फसवणुकीची रक्कम जमा झाली होती, पोलिसांनी त्या कमलेश दाताराम शर्मा यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने नोएडा येथून न मोठ्या शिताफीने व व्यावसायिक कौशल्य दाखवून ताब्यात घेतले. त्याने चौकशी दरम्यान त्याच्या नावावर असलेले बँक खाते नोएडा येथीलच राहूल ठाकूरप्रसाद पांडे व छोटलाल कल्लू यांना वापरायला दिले असल्याचे सांगितले. त्या दोघांनाही अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी सायबर गुन्हे करणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील सदस्य असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
 
 
Online Fraud ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार यांच्या नेतृत्वात निखिल माहुरे, उल्हास टवलारे, नरेंद्र उघडे, अश्विन यादव, रोशन लकडे, अनिकेत वानखडे, करण बोरकुटे, बाळू पालवे, सुषमा आठवले, सपना साखरे यांनी केली.