इस्लामाबाद,
Pakistan's threat to India भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर भारत–पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा मोठा तणाव निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्रमक भूमिका घेत भारतावर गंभीर आरोप केले असून, पाण्याचा प्रवाह रोखणे हे युद्धकृत्य मानले जाईल, असा इशारा दिला आहे. भारत सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सीमापार दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर सिंधू पाणी करार सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या अधिकृत भूमिकेनुसार, भविष्यात भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा प्रवाह मर्यादित करण्याच्या दिशेने धोरणात्मक उपाययोजना सुरू आहेत.
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या विधानानंतर हा मुद्दा अधिकच तीव्र झाला आहे. त्यांच्या मते, सरकारकडून पाणी व्यवस्थापन आणि वळवण्याच्या प्रकल्पांवर काम सुरू असून, आगामी काळात भारताच्या जलस्रोतांचा अधिक प्रभावी वापर केला जाणार आहे. तसेच या निर्णयावर वरिष्ठ पातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, भारताच्या या निर्णयामुळे त्यांच्या देशातील लाखो नागरिकांवर पाण्याचे संकट ओढवू शकते आणि हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे. तसेच पाणी हे दबावाचे साधन म्हणून वापरण्याचा प्रयत्न स्वीकारार्ह नसल्याचेही पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. याच निवेदनात संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा हवाला देत, अशा परिस्थितीत युद्धासारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, भारताने पूर्वीपासूनच सिंधू पाणी कराराबाबत कठोर भूमिका घेतली असून, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर करार स्थगित करण्यात आल्याचे सांगितले जाते. भारताचे म्हणणे आहे की दहशतवाद आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत. १९६० च्या सिंधू पाणी करारानुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये सहा नद्यांचे वाटप झाले आहे. मात्र भारताने आता चिनाब नदीच्या पाण्याचा अधिक प्रभावी वापर करण्याची योजना आखली असून, काही प्रमाणात पाणी वळवण्याच्या प्रकल्पावर काम सुरू असल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण चिनाब नदीचे पाणी पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.