वणीत प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
वेकोलिमार्फत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी

वणी, 
Pollution in Wani  वणी उपविभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वेकोलि व इतर कंपन्यांच्या कोळसा खाणी, कोळसा सायडिंग आणि कोळसा उत्खननामुळे वाढलेल्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी वणी येथे वेकोलि कंपनीमार्फत अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तातडीने सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
 
 
Raju vkdso
 
मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात उंबरकर यांनी वणी परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधले आहे. वणी उपविभाग राज्यातील महत्त्वाचे कोळसा उत्पादन क्षेत्र असून, येथील खाजगी व शासकीय कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कोळसा उत्खनन केले जाते. मात्र, या उद्योगांमधून निर्माण होणाèया प्रदूषणाचा फटका स्थानिक नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
कोळसा वाहतूक करणाèया अवजड वाहनांमुळे उडणारी धूळ, सायडिंग परिसरातील प्रदूषण, खाणींमधील स्फोट तसेच खराब रस्त्यांमुळे संपूर्ण परिसरातील वातावरण दूषित झाले आहे. हवेत मिसळणाèया कोळशाच्या सूक्ष्म धुळीमुळे नागरिकांना श्वसनविकार, दमा, खोकला, छातीत दुखणे, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, रक्तदाब, हृदयविकार तसेच फुफ्फुस आणि स्तनांचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्गाला बसत असल्याचेही उंबरकर यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि शेतीची जमीनही प्रदूषित होत असल्याच्या तक्रारी येत असून, त्यामुळे शेती उत्पादनावरही विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
 
 
वणी येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे रुग्णांना नागपूर, पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
 
यावर उपाय म्हणून वणी येथे वेकोलीच्या सामाजिक दायित्व निधीतून सर्व सुविधांनी सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात कर्करोग, फुफ्फुस व हृदयविकार विभाग, अत्याधुनिक आपत्कालीन सेवा, आयसीयू, सीटी स्कॅन, एमआरआय यांसह आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाèयांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. वणी उपविभागातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात आणि या जनहिताच्या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्यासाठी तीव्र आंदोलनात्मक पावले उचलली जातील, असा इशाराही मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे.