स्त्री कोणतीही असो कोणत्याही पदावर असो तिच्यासाठी साडी हा विषय कायम जिव्हाळ्याचा असतो. वर्धेतील मगन संग्रहालयात प्रेमाने विणलेली अशीच साडी देशाच्या प्रथम नागरिक President Draupadi Murmu राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची जिव्हाळ्याची ठरली आणि त्यांनी ती परिधान केली. त्याच क्षणी मगनसंग्रहालयातील खादी विभाग प्रमुखांच्या रात्रभराच्या परिश्रमाला राष्ट्रीय सन्मानाचे रूप मिळाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पसंतीस उतरलेल्या मगन संग्रहालयातील साडीची चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वर्धा दौर्यात जिल्हा प्रशासनाकडून भेट म्हणून देण्यात आलेल्या दोन साड्या मगन संग्रहालयात तयार झाल्या. त्या साड्यांनी आता विशेष लक्ष वेधून घेतले आहे. खादी आणि सिल्क अशा दोन साड्या राष्ट्रपतींना भेट देण्यात आल्या. विशेष म्हणजे, अलीकडे काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींनी वर्धेतून भेट मिळालेली साडी परिधान केल्याचे दिसून आल्याने स्थानिक कारागिरांची कॉलर टाईट झाली आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांचा वर्धा दौरा निश्चित झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांपूर्वी मगन संग्रहालय समिती खादी विभाग प्रमुख मुकेश लुतडे यांच्याकडे विशिष्ट रंगछटांतील दोन साड्यांची मागणी केली होती. मात्र, त्या रंगांच्या साड्या त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. राष्ट्रपतींना आपल्या हातची साडी भेट म्हणून जाणार असल्याचे समजताच मुकेश लुतडे यांनी रात्रभर मेहनत घेत अत्यंत अल्पावधीत दोन आकर्षक साड्या तयार केल्या. त्यापैकी टसर बाय टसर ही सिल्क साडी भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथुन मागवली. खादी आणि सिल्ड कोसा साड्यांवर मदनवाडीतील कॉपर लिफ (कुपी)या झाडांची पानं तोडून दोन्ही साड्यांवर नैसर्गिक रंगसंगती करण्यात आली. त्या दोन्ही साड्या जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेट देण्यात आल्या. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत वीर चक्र आणि पद्म पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती मुर्मू त्यापैकी एक साडी परिधान केल्याचे दिसून आल्याने वर्धेच्या मगनवाडीत तयार झालेल्या नैसर्गिक रंगांच्या विणकामाला राष्ट्रीयस्तरावर नवी ओळख मिळाली आहे. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यतींना अनेक भेट वस्तू मिळत असतात. परंतु, राष्ट्रपती मुर्मु यांनी वर्धेची मायेची भेट मात्र आत्मियतेने स्वीकारली असेच म्हणावे लागेल.
President Draupadi Murmu राष्ट्रपतींनी आपल्या हातची साडी परिधान केली. यापेक्षा मोठा सन्मान आमच्यासाठी असू शकत नाही. त्यासाठी घेतलेली रात्रभराची मेहनत आज सार्थकी लागल्याचे समाधान आहे, अशी भावना खादी विभाग प्रमुख मुकेश लुतडे यांनी व्यत केली. यापूर्वी मगन संग्रहालयातील सुतमाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आली होती. त्या सुतमाळेकरिताही स्पेशल ऑर्डर देण्यात आली होती. त्या सुतमाळेत भगवा रंगाचा धागा टाकण्यात आला होता. नियमित वजनापेक्षा पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांना भेट देण्यात आलेल्या सुतमाळेचे वजन जास्त होते, हे उल्लेखनिय!