लक्ष द्या... 9 तासांचा 'मेगाब्लॉक' मोठा परिणाम होणार

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
पुणे
railway mega block पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी, १४ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल नऊ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून त्याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. पुणे-दौंड विभागातील इलेक्ट्रिक, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
 

railway mega block 
नियोजन आवश्यक
या कालावधीत पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून मुंबईहून येणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. परिणामी अनेक लोकल, डेमू आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग व थांबे बदलण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.मेगा ब्लॉकमुळे पुणे-तळेगाव लोकल, तळेगाव-पुणे लोकल, बारामती-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमू आणि सातारा-पुणे डेमू या स्थानिक गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज या गाड्यांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही बदल करण्यात आले असून पुणे-नागपूर-पुणे एक्सप्रेस आणि मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस या दोन्ही महत्त्वाच्या गाड्या रविवारी रद्द राहणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.याशिवाय काही गाड्यांच्या थांब्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. जयपूर-पुणे एक्सप्रेस आणि सीएसएमटी-पुणे एक्सप्रेस या गाड्या खडकी स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत. तर झेलम एक्सप्रेस आणि railway mega block  अमरावती-पुणे एक्सप्रेस या गाड्या हडपसर स्थानकावरच प्रवास समाप्त करतील. तसेच पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी सातारा स्थानकावरूनच सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
 
दरम्यान, पुणे-मुंबई आणि पुणे-जयपूर एक्सप्रेस या काही गाड्या नियोजित वेळेनुसारच धावणार असल्याने त्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.या पार्श्वभूमीवर रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत माध्यमांद्वारे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. मेगा ब्लॉकमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी आगाऊ नियोजन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.