पुणे,
Pune robbery पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मध्यरात्रीनंतर एका सराईत दरोडेखोर टोळीने अवघ्या काही तासांत चार ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. खोरवडी आणि आलेगाव परिसरातील वस्त्यांमध्ये घुसून दरोडेखोरांनी महिलांना आणि वृद्धांना मारहाण करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल तसेच दुचाकी असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत.
कुठे घडली घटना
मध्यरात्रीनंतर साडेबारा ते एकच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळीने खोरवडी गावाजवळील बावरीनगर परिसरातील सिधू शिंदे यांच्या घरावर पहिला दरोडा टाकला. धारदार शस्त्रांच्या धाकावर घरात घुसलेल्या आरोपींनी ६० वर्षीय सिधू शिंदे यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. दरोडेखोरांनी घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सुमारे ४ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
पहिल्या घटनेनंतर अवघ्या Pune robbery अर्ध्या तासात टोळीने जवळील आवदे वस्तीवर धाड टाकली. येथे विमल आवदे, शोभा खोमणे आणि अर्चना आवदे यांना शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून सुमारे १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लुटला. घरातील महिलांच्या आरडाओरडामुळे ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक करत परिसरात दहशत निर्माण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आरोपी रेल्वे रुळांच्या दिशेने पळून गेले.
यानंतर टोळीने रेल्वेमार्गालगतच्या Pune robbery भागात आणखी दोन ठिकाणी दरोडे घातले. रात्री अडीचच्या सुमारास मुकिंदा चलवादी यांच्या विटभट्टीवरील घरात घुसून आरोपींनी कपाटे आणि दरवाजे फोडले. मुकिंदा चलवादी यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन आणि सुमारे २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली.पहाटे तीनच्या सुमारास आलेगाव येथील धुमाळवस्तीवरही टोळीने हल्ला चढवला. घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या मीना कदम यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेण्यात आले. याशिवाय परिसरातील एक मोटारसायकल चोरून आरोपींनी सुमारे ६० हजार रुपयांचा माल लंपास केला.पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोर आपापसात मराठीत संवाद साधत होते. टोळीतील काही जणांच्या हातात मोठे कोयते आणि धारदार शस्त्रे होती. एका आरोपीने काळा टी-शर्ट परिधान केला होता, तर दुसऱ्याने चेहरा झाकण्यासाठी बुर्ख्याचा वापर केला होता. त्यामुळे आरोपींची ओळख पटविणे अधिक आव्हानात्मक ठरत आहे.एकाच रात्री, एकाच पद्धतीने आणि अल्प अंतराने घडलेल्या या चारही घटनांमागे एकाच गुन्हेगार टोळीचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी दौंड शहराच्या दिशेने पसार झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या हालचालींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष पथके कार्यरत झाली आहेत.या धाडसी दरोड्यांमुळे दौंड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाने आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.