पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमधून चार लाखांचा गांजा जप्त

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
* ऑपरेशन नार्कोस अंतर्गत आरपीएफची मोठी कारवाई

गोंदिया, 
Puri-Ahmedabad Express: Ganja seized दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ऑपरेशन नार्कोस अंतर्गत अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळविले असून रेल्वेगाडी क्रमांक 12843 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमधून सुमारे 3 लाख 98 हजार 600 रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
 
 
Ganja seized
 
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळातील आरपीएफकडून राज्य पोलिस व इतर कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या समन्वयाने रेल्वेमार्गे होणारी अंमली पदार्थ, मद्य, तंबाखूजन्य पदार्थ आदींची तस्करी रोखण्यासाठी विशेष तपास मोहीम सातत्याने राबविली जात आहे. मंडळ सुरक्षा आयुक्त आरपीएफ नागपूर चेतन दिलीपराव जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली 10 जून रोजी मंडळ टास्क टीम व आरपीएफ पोस्ट गोंदिया यांनी गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडी क्रमांक 12843 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसची तपासणी केली असता बोगी क्रमांक एस-3 मध्ये शौचालयाच्या छतावर एक बेवारस चेक बॅग आढळली. ज्यामध्ये 7.972 किलोग्रॅम वजनाचा गांजा किमत 3 लाख 98 हजार 600 रुपये आढळून आला. पथकाने सदर गाजा जप्त करून एनडीपीएस कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करत जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी), गोंदिया यांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी जीआरपी गोंदिया यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.