शासनाच्या 50 टक्के अनुदानावरील धान बियाणांमध्ये भेसळ!

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
- शेतकर्‍यांमध्ये संताप : उच्चप्रतीचे धान बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

अर्जुनी मोरगाव, 
Quality of paddy seeds स्थानिक पंचायत समिती अंतर्गत 50 टक्के अनुदानावर वितरित करण्यात आलेल्या धान बियाण्याच्या गुणवत्तेबाबत शेतकर्‍यांनी गंभीर आक्षेप नोंदविल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. महागाव येथील शेतकरी संजीव शंकर मेश्राम यांनी महाबीज कंपनीचे सुवर्णा वाणाचे 50 किलो धान बियाणे अनुदानित दरात खरेदी केले होते. मात्र घरी आणल्यानंतर बियाण्याची पाहणी करताना त्यांना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचे धान्य आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
 

gondidlsl 
 
मेश्राम यांनी सांगितले की, 25 किलोच्या एका पिशवीत सुमारे 600 ते 700 ग्रॅम लांब व हलक्या प्रतीचे धान बियाणे मिसळलेले आढळले. त्यामुळे बियाण्याच्या शुद्धतेवर आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत इतर लाभार्थी शेतकर्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडूनही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्याचे त्यांनी सांगितले. धान पेरणीचा हंगाम सुरू असताना शेतकरी मोठ्या अपेक्षेने शासनाच्या अनुदानित योजनांचा लाभ घेत असतात. मात्र, बियाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली असून याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कमी प्रतीचे किंवा मिश्रित बियाणे वापरल्यास उगवण क्षमता घटणे, उत्पादनात घट येणे आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते छगन साखरे यांनी संबंधित कृषी विभाग व पंचायत समिती प्रशासनाने तातडीने चौकशी करून बियाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी केली आहे. तसेच दोषी आढळल्यास संबंधित पुरवठादारांवर कारवाई करून शेतकर्‍यांना उच्च प्रतीचे व प्रमाणित धान बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. शासनाच्या अनुदानित योजनांचा उद्देश शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा देण्याचा असतो. परंतु निकृष्ट दर्जाचे बियाणे मिळाल्यास अनुदानाचा लाभ मिळण्याऐवजी नुकसानच सहन करावे लागते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकर्‍यांचा विश्वास कायम राखण्यासाठी त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.