‘क्यू डे’साठी तयार आहात का?

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
वेध,
रेवती जोशी-अंधारे,

quantum-computers : डिजिटल क्रांती झपाट्याने स्वीकारून आपण भारतीय वेगाने पुढे जात आहोत. हा हा म्हणता सगळ्या आर्थिक स्तरावरील मंडळींसाठी स्मार्टफोन ही जीवनावश्यक वस्तू बनली. त्यासोबत वापरायचे तऱ्हेतऱ्हेचे गॅजेट्स, अ‍ॅप्स, डाऊनलोडिंग, शेअरिंग, अपडेट्स असे अनेक परवलीचे शब्द तयार झाले आणि जनसामान्यांच्या तोंडात स्थानापन्न झाले. सोबतच ई-बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग, ई-कॉमर्स अशा सगळ्या नवनवीन गोष्टी ‘सोय’ म्हणून वापरू लागलो आणि त्याची सवय अंगवळणी पडली. दुसरीकडे, सोशल मीडियावर मनोरंजन म्हणून, रील बनवून कमाई करणाऱ्यांची फौज उभी झाली आहे. शिवाय, स्मार्टफोनला मागे टाकून विअरेबल म्हणजे अंगावर घालण्याजोगे डिव्हाईसेस जेन झीची पसंत बनते आहे. सगळं खूप फटाफट घडतंय आणि त्यावर सध्या तरी आक्षेप घेण्यासारखं काही वाटत नाही. पण, या वेगाच्या दुसऱ्या बाजूचा ‘वेध’ घेऊ या.
 
 
 
quantum-computers
 
 
भारतीयांची अशी सगळी कामे झटपट होत असताना, त्या सर्व्हरवर कुठेतरी, कदाचित भारताच्या सीमांपलीकडे, एखाद्या देशाने तयार केलेली गुप्तयंत्रणा शांतपणे ही सगळी माहिती अर्काईव्ह करत असेल तर...आज हे सगळे पासवर्ड्स, ओटीपी, फोटो-व्हिडीओज्, खाजगी संभाषण, सीसीटीव्ही फूटेज वगैरे ‘एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड’ दिसत असले तरी ते जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ते जसेच्या तसेच जपून ठेवले जात आहेत. यासाठी जगभरातील देश काम करत असले तरी चीन त्यात अग्रेसर आहे. आपली इस्रोदेखील क्वांटम जगभरात 518 कंपनीज् यासाठी काम करत असून त्यापैकी 414 कंपनीज् चीनच्या आहेत. त्यातही, या कामासाठी ‘सॉल्ट टायफून’ ही चीन सरकारची अधिकृत एजन्सी मानली जाते. ऑक्टोबर 2024 मध्ये ‘सॉल्ट टायफून’चे काम जगापुढे आले होते.
 
 
 
माहितीचा हा प्रचंड साठा कशासाठी एकत्र केला जातोय? या प्रश्नाचे उत्तर ‘क्यू डे’च्या संकल्पनेत आहे. क्वांटम कंप्युटर्स म्हणजे अफाट क्षमतेचे भावी अत्याधुनिक हार्डवेअर जे नजीकच्या भविष्यात या संपूर्ण माहितीवर प्रक्रिया करून, ती खुली करू शकतील. आजच्या कॉम्प्युटर्सचे काम बिट्सवर चालते तसे, क्वांटम कॉम्प्युटर्स क्विबिट्सवर काम करतील. उदाहरणार्थ, आजपर्यंत उपलब्ध असलेला डेटा एन्क्रिप्ट करण्यासाठी सध्याच्या वेगवान कॉम्प्युटर्सना 100 वर्षांवर कालावधी लागू शकतो. हेच काम क्वांटम कॉम्प्युटर 8 ते 10 वर्षांमध्ये पूर्ण करू शकेल. हे ज्या दिवशी होईल तो दिवस असेल क्यू डे! रेल्वे-विमान यंत्रणांपासून बँकांपर्यंत, शेअर बाजारापासून आधार कार्डच्या बायोमेट्रिक डेटापर्यंत, टपाल खात्यांपासून माध्यमांपर्यंत इंटरनेटशी संबंधित व्यवस्था कोलमडेल. संरक्षण खात्याची माहिती, अण्वस्त्रांचे पासवर्डस्ही डिकोड होतील. जगाच्या कानाकोपèयातील सीसीटीव्ही प्रत्येकाची दैनंदिनी चव्हाट्यावर आणतील.
 
 
यालाच म्हणतात एचएनडीएल म्हणजे हार्वेस्ट नाऊ, डिक्रीप्ट लेटर! म्हणजेच, आज मिळेल तेवढी माहिती संग्रहित करून ठेवा आणि क्वांटम कॉम्प्युटर्स कार्यान्वित होताच, माहिती डिक्रिप्ट करा. ग्लोबल रिस्क इन्स्टिट्यूटच्या 32 क्वांटम संशोधकांच्या मते, 2033 ते 2037 दरम्यान, या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन, कोणत्याही देशावर असा क्यू डे हल्ला होऊ शकेल. रक्ताचा एक थेंबही न सांडता, एखाद्या राष्ट्राला नेस्तनाबूत करता येईल. या सगळ्यात प्रशासकीय यंत्रणेतील मोठा डेटा हल्लेखोरांच्या हाती लागू शकतो. याचे प्रात्यक्षिक रशिया-युक्रेन आणि इस्रायल-इराण युद्धाच्या वेळी आपण बघितले आहेत. प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी युक्रेन आणि इराणवर सायबर हल्लेच करण्यात आले होते.
 
 
 
हा धोका ओळखून भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला, राष्ट्रीय क्वांटम मिशन या आगामी 8 वर्षांसाठीचा दूरदर्शी उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी 6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. आगामी क्वांटम युगाची पावले नेमकी ओळखून घेतलेल्या या निर्णयामुळे क्वांटम सुरक्षा ही शक्यता नाही तर धोरणात्मक गरज आहे आणि गेल्या 30 वर्षांत सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील हा एकमेव सर्वांत मोठा बदल आहे. भविष्यातील हल्ल्यांपासून सुरक्षा महत्त्वाची असली तरी आजच आपला डेटा सुरक्षित ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे.
 
 
भारत सरकारच्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचा खारीचा वाटा असायलाच हवा. डिजिटल देवाणघेवाण करण्यासाठी स्वतंत्र बँक खात्याचा वापर करायला हवा. आर्थिक व्यवहार शक्यतो प्रत्यक्षात करावे. खाजगी फोटो-संभाषण, महत्त्वाचे दस्तावेज सोशल मीडियावर शेअर करताना टायमर लावण्यासारखी काळजी घ्यावी. देशभरातील आयआयटीज्मध्ये क्वांटम सिक्युरिटी या विषयावर लहानमोठे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते करून या क्षेत्रात करीयर घडविण्याच्याही संधी आहेत. संकटाचे रूपांतर संधीत कसे करायचे? हे आपण भारतीय जाणतोच.‘क्यू डे’साठी तयारी करण्याची हीच ती वेळ आहे.
9223700277