*11.31 लाखांचा मुद्देमाल जप्त
*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर,
Raid on fake tobacco factory महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा अवैध साठा करून यंत्राच्या सहाय्याने बनावट तंबाखूची निर्मिती व विक्री करणार्या सावली तालुक्यातील रयतवारी परिसरातील एका केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, सावली पोलिस आणि अन्न सुरक्षा विभागाने गुरूवारी संयुक्त धाड टाकली. या धडक कारवाईत एकूण 11 लाख 31 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावली तालुक्यातील रयतवारी येथे विजय भिमाजी भांडेकर (33, रा. सामदा बु, ता. सावली) हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा बाळगून आहे. तसेच तो यंत्राच्या सहाय्याने बनावट तंबाखू तयार करून त्याची बाजारात विक्री करीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखा, सावली पोलिस व अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने रयतवारी येथील संशयास्पद ठिकाणावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी होला आणि इगल ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, तंबाखू पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, उत्पादन व पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहन (एमएच 34 सीजे 9625) असा एकूण 11 लाख 31 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपी विजय भांडेकर याची कसून चौकशी केली असता, त्याने हा सर्व कच्चा माल आणि साहित्य विनय गुप्ता (रा. गोकुळ नगर, गडचिरोली) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.
जप्त साहित्यावरून आरोपी हा मोठ्या प्रमाणावर बनावट तंबाखूचे पॅकिंग आणि बेकायदेशीर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरुन प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून मानवी आरोग्याला घातक ठरणार्या सुगंधित तंबाखूचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये सावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.