remedy on Somvati Amavasya हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यातही सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या अत्यंत पुण्यदायी मानली जाते. यंदा अमावस्या तिथी दोन दिवसांवर येत असल्याने अनेकांमध्ये सोमवती अमावस्या नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पंचांगानुसार अमावस्या तिथी १४ जून रोजी दुपारी सुरू होऊन १५ जून रोजी सकाळपर्यंत राहणार आहे. उदयतिथीचा विचार करता सोमवती अमावस्या १५ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने तसेच स्नान, जप आणि दान केल्याने पुण्यप्राप्ती होते. अनेक भक्त या दिवशी उपवास करून विविध धार्मिक विधी करतात. सोमवती अमावस्येला प्रदोषकाळात दिवा लावण्यालाही विशेष महत्त्व दिले जाते. श्रद्धेनुसार या वेळी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सुख-समृद्धीचा वास राहतो.
परंपरेनुसार या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. तसेच पूर्वजांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचीही प्रथा आहे. पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करणे आणि तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे हे देखील अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने केले जाते. या कृतींमुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि कुटुंबात आनंद, शांतता व आर्थिक स्थैर्य वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे.यंदाच्या सोमवती अमावस्येनिमित्त मंदिरांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर विशेष पूजा-अर्चा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांमध्येही या दिवसाबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.