विश्वचषकाआधी कर्णधार वातारू एंडोची निवृत्ती

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
टोकियो,
Retirement of captain Wataru Endo फिफा विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच जपानच्या फुटबॉल संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार वातारू एंडो याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली असून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचीही घोषणा केली आहे. जपान फुटबॉल संघ व्यवस्थापनाने या निर्णयाला दुजोरा दिला आहे. राष्ट्रीय संघाचे संचालक मासाकुनी यामामोटो यांनी स्पष्ट केले की एंडो पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरू शकलेला नाही, त्यामुळे तो विश्वचषकासाठी उपलब्ध नसणार आहे. जपान १४ जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध आपला विश्वचषक प्रवास सुरू करणार आहे.
 
 

Wataru Endo 
 
३३ वर्षीय मिडफिल्डर एंडो हा जपान संघातील सर्वात अनुभवी आणि महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. संपूर्ण पात्रता फेरीत त्याने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या फिटनेसवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते. पुनरागमनाच्या प्रयत्नांनंतरही तो पूर्ण तंदुरुस्त होऊ शकला नाही.एंडोने ३१ मे रोजी आइसलँडविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात काही काळ मैदानात पुनरागमन केले होते. तरीही विश्वचषक शिबिरात तो स्वतंत्र सराव करत असल्याने त्याच्या स्थितीबाबत अनिश्चितता कायम होती. अखेर संघ व्यवस्थापनाने त्याला स्पर्धेतून वगळण्याचा निर्णय घेतला.
 
त्याच्या जागी फॉरवर्ड शुटो माचिनोची संघात निवड करण्यात आली असून सेंटर-बॅक इताकुरा याला नवीन कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.निवृत्ती जाहीर करताना एंडोने भावनिक प्रतिक्रिया दिली. दुखापतीतून परतण्यासाठी सर्व प्रयत्न केले, पण विश्वचषक गमावल्याचे दुःख असल्याचे त्याने सांगितले. तरीही जपान संघाच्या प्रगतीचा भाग होता याचा अभिमान असल्याचेही त्याने नमूद केले. तो पुढे म्हणाला की संघ आता अधिक मजबूत आहे आणि तो एक चाहत्याप्रमाणे संघाला पाठिंबा देत राहील. एंडोने जपानसाठी एकूण ७३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून अनेक महत्त्वाच्या विजयांमध्ये त्याचा निर्णायक वाटा राहिला आहे. आता नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली जपानचा संघ विश्वचषकात आपली ताकद आजमावणार आहे.