सोशल मीडियावर बदनामीला मुभा नाही

सलमान-केतन जमीन वाद पुन्हा चर्चेत

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
मुंबई
Salman Khan अभिनेता सलमान खान आणि त्यांचे शेजारी केतन कक्कर यांच्यात पनवेलमधील जमिनीच्या वादावरून सुरू असलेल्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. सोशल मीडिया हे कोणत्याही व्यक्तीची, मग ती सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी, बदनामी करण्याचे माध्यम नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने केतन कक्कर यांना सलमान खानविरोधातील सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओ हटविण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले.
 

Salman Khan 
न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सोशल मीडियाचा वापर करून आरोप-प्रत्यारोप का केले जात आहेत, असा सवाल उपस्थित केला. न्यायालयाने कक्कर यांना संयम बाळगण्याचा सल्ला देत कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे साहित्य प्रसारित न करण्याचे निर्देश दिले.
 
 
 काय आहे प्रकरण?
 
हा वाद रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरातील अडीच एकर डोंगराळ जमिनीशी संबंधित आहे. केतन कक्कर यांनी संबंधित जमीन त्यांच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. कक्कर कुटुंबाने 1990 च्या दशकात निवृत्तीनंतरच्या वास्तव्यासाठी ही जमीन खरेदी केली होती. त्यावेळी जमीन विक्री करणाऱ्या कंपनीमार्फत त्यांची ओळख सलमान खान यांचे वडील यांच्याशी झाली होती. अनेक वर्षे दोन्ही कुटुंबांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे सांगितले जाते.
मात्र, 2019 नंतर या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. कक्कर यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मालकीच्या जमिनीवर जाण्याचा मार्ग अडवण्यात आला, वीजपुरवठा खंडित करण्यात आला तसेच त्यांच्या मालकीच्या पर्यावरणपूरक घरासह गणपती मंदिर पाडण्यात आले. याशिवाय संबंधित जमीन खाजगी वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी काही कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.दुसरीकडे सलमान खान यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेल्या भूमिकेनुसार, कक्कर यांना खरेदी करायची असलेली जमीन बेकायदेशीर व्यवहारातून मिळाल्याचे आढळल्याने संबंधित प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतरच सलमान खान यांच्याविरोधात आरोप करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.
आपसातील चर्चा आणि तोडगाSalman Khan  काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर केतन कक्कर यांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि पोस्ट प्रसिद्ध केल्या. काही व्हिडीओंमध्ये त्यांनी सलमान खान यांच्याविरोधात गंभीर आरोप करत त्यांची तुलना ऐतिहासिक व्यक्तींशी केली होती. तसेच धार्मिक संदर्भ देत वादाला वेगळे स्वरूप देण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
यानंतर सलमान खान यांनी केतन कक्कर यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. या खटल्यात त्यांनी गुगल, युट्यूब, फेसबुक, एक्स तसेच काही कंटेंट निर्मात्यांनाही पक्षकार केले आहे. संबंधित पोस्ट आणि व्हिडीओंमुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असून समाजात जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.कनिष्ठ न्यायालयाकडून अपेक्षित दिलासा न मिळाल्यानंतर सलमान खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सोशल मीडियाचा वापर करून व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “सोशल मीडियावर सहजपणे मत व्यक्त करता येते, याचा अर्थ कोणाचीही बदनामी करण्याचा अधिकार मिळत नाही,” असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी निश्चित केली आहे.