शेगावच्या प्रसिद्ध कचोरी केंद्राचे नमुने एफडीएकडून तपासणीसाठी जप्त

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
राज्यभर सुरू असलेल्या मोहिमेची संतनगरीतही धडक
तेल व मैद्याचे नमुने ताब्यात
 
शेगाव:
Santnagari Shegaon अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईची झळ आता संतनगरी शेगावलाही बसली आहे. शहरातील सर्वात जुने व प्रसिद्ध असलेल्या तीरतराम शेगाव कचोरी सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक भेट देत खाद्यपदार्थ निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.

ndksldsu 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जून रोजी दुपारी सुमारे ३ वाजता बुलढाणा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित कचोरी केंद्रावर तपासणी केली. यावेळी कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल व मैद्याचे नमुने अधिकृत तपासणीसाठी जप्त करण्यात आले.
राज्यभर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेगावातील या प्रसिद्ध खाद्यपदार्थ केंद्राची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपासणीदरम्यान घेतलेल्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण करण्यात येणार असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
शेगावातील प्रसिद्ध कचोरी केंद्रावर झालेल्या या कारवाईमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून आता नमुन्यांच्या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.