बुलढाणा, :
Sister's murder case सख्ख्या बहिणीचा खून केल्याप्रकरणी आरोपी सागर चंद्रक शर्मा याला बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. श्रीचंद दोलतराम जगमलानी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रकरणानुसार, 28 जुलै 2020 रोजी बुलढाणा येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या सागर शर्मा याने त्याची सख्खी बहीण अंकिता हिचा केबल वायरने गळा आवळून व चाकूने वार करून खून केला होता. दारू पिण्याच्या सवयीमुळे समाजात बदनामी होत असल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
घटनेनंतर आरोपीने स्वतः बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने भौतिक पुरावे गोळा करण्यात आले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू व कपडे जप्त करण्यात आले. तपासादरम्यान वैज्ञानिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत एल. भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. फिर्यादी कोकिला जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सावळे, तपास अधिकारी पीएसआय अमित राजाराम जाधव यांच्यासह महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली.
सर्व पुरावे व साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप व 10 हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय अमित राजाराम जाधव यांनी केला असून, न्यायालयीन प्रक्रियेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर कांबळे यांनीही सहकार्य केले. तसेच पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहे