मृगाचा समुद्रपुरातून प्रवेश; गिरड परिसरात वादळी पाऊस

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
* वीजपुरवठा खंडित
*गिरड-कोरा मार्गावर झाडे कोसळून वाहतूक ठप्प
 
समुद्रपूर, 
Stormy rain in the Girad  रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. मृग लागूनही पाच दिवस उलटले. पण, पावसाचा थांग पत्ता नसल्याने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला आहे. पाऊस कधी येईल अशीच चर्चा सर्वत्र सुरू असताना आज शुक्रवारी मृगनक्षत्रातील पावसाचा प्रवेश समुद्रपूर तालुयातून झाला.
 
 
girad
 
गिरड परिसरात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ३ वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या आठवडाभरापासून परिसरात उष्णता व उकाड्याचे प्रमाण लक्षणीय वाढले होते. आज झालेल्या पावसाने दिलासा मिळाला. गिरड परिसरात झालेल्या वादळी वार्‍यांचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडे कोलमडली. परिणामी काही भागांतील विद्युत वाहिन्यांचे नुकसान होऊन काही तास वीजपुरवठा खंडित झाला. गिरड कोरा मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी पेरणीच्या कामांना याचा फायदा होणार आहे.
 
 
जून महिना अर्ध्यावर आला तरी वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. यंदा मृग नक्षत्र सुरू होऊन आणि त्याचे वाहन ‘बेडूक’ असतानाही पावसाने हजेरी लावलेली नसल्याने नजरा आकाशाकडे लागल्या आहे. यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी आणि तीव्र उष्णतेचा सामना केला. तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झाले होते. जून महिना सुरू झाल्यानंतरही उन्हाचा तडाखा कायम असल्याने वातावरणात उकाडा कायम आहे. परिणामी नागरिकांना मे महिन्याचीच झळ अजूनही सहन करावी लागत आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने शेतीच्या कामांनाही मोठा फटका बसत आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने जिल्ह्यातील आठही तालुयात पेरणीला गती आलेली नाही. शेतीचे संपूर्ण गणित आता पहिल्या दमदार पावसावर अवलंबून आहे.

पाणी पातळीत कमालीची घट
एकीकडे पाऊस बेपत्ता झाला आहे तर दुसरीकडे भू-गर्भातील पाण्याची पातळीही झपाट्याने खाली जात आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या समस्येने डोके वर काढले आहे.
 
वर्धेतही सरी...
वर्धेत आज सकाळपासुन उन्हाचे चटके बसत होते. दुपारनंतर वातावरणात बदल झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ढगाळी वातावरण तयार झाले आणि शहरातील काही भागात मृगाच्या पहिल्या सरी आल्या. त्यामुळे सर्वत्र मृदगंध दरवळत होता. शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांनाही दमदार पावसाची अपेक्षा आहे.