प्रणीत मोरे, हिमांशू जांगराला समन्स

कॉमेडी शोमधील टिप्पणीवरून वाद वाढला

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
गुरुग्राम,
Summons issued to Pranit More एका स्टँड-अप कॉमेडी शोमधील संवादावरून सुरू झालेला वाद आता राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने कॉमेडियन प्रणीत मोरे आणि हिमांशू जांगरा यांना नोटीस बजावत २२ जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना हरियाणा पोलिसांनाही देण्यात आल्या आहेत. वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या व्हिडिओमध्ये एका डेटिंग अनुभवावर चर्चा करण्यात आली होती. त्यामध्ये डेटदरम्यान बिर्याणीवर खर्च केलेल्या रकमेचा उल्लेख करत काही टिप्पणी करण्यात आली होती. या वक्तव्याचा काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील दृष्टिकोन म्हणून निषेध केला. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.
 

 Pranit More 
 
या प्रकरणामुळे कॉमेडियन प्रणीत मोरे यांच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली. वाढत्या वादानंतर त्यांनी सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील त्यांचे खातेही काही काळासाठी निष्क्रिय करण्यात आले. दुसरीकडे, या संपूर्ण घटनेवर मतभेदही दिसून आले. काहींनी संबंधित वक्तव्यांना विनोदाचा भाग मानले, तर अनेकांनी त्यास महिलांचा अपमान करणारे आणि चुकीचा संदेश देणारे असल्याचे म्हटले. राष्ट्रीय महिला आयोगाने मात्र या विषयाकडे गांभीर्याने पाहत दोघांनाही स्पष्टीकरणासाठी समन्स बजावले आहे. आयोगासमोर हजर राहून आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले असून, या सुनावणीनंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.