इस्लामाबाद
Netflix Pakistan भारतीय चित्रपटसृष्टीची लोकप्रियता केवळ देशापुरती मर्यादित नसून जगभरातील प्रेक्षकांवर तिचा प्रभाव कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही बॉलिवूड चित्रपटांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. नेटफ्लिक्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या ट्रेंडिंग यादीत पाकिस्तानमधील टॉप १० चित्रपटांमध्ये पहिल्या चार क्रमांकांवर भारतीय चित्रपटांनी स्थान मिळवले आहे. त्यामुळे पाकिस्तानातील प्रेक्षकांमध्ये भारतीय चित्रपटांविषयीचे आकर्षण अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.
कोणते चित्रपट लोकप्रिय?
नेटफ्लिक्सच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनीत ‘मां बहन’. नुकताच प्रदर्शित झालेला हा डार्क कॉमेडी थ्रिलर चित्रपट गेल्या आठवड्यापासून प्रेक्षकांची पसंती मिळवत असून ट्रेंडिंग यादीत अव्वल स्थानावर आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत तृप्ती डिमरी, धारणा दुर्गा, गीतांजली कुलकर्णी आणि रवि किशन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.दुसऱ्या क्रमांकावर तमिळ अभिनेता धनुषचा ‘कारा’ हा चित्रपट आहे. दिग्दर्शक विग्नेश राजा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला पाकिस्तानमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून तो सलग दोन आठवड्यांपासून टॉप १० यादीत कायम आहे.तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता रणवीर सिंहचा ‘धुरंधर: द रिवेंज’ हा चित्रपट आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने थिएटरनंतर ओटीटीवरही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या चार आठवड्यांपासून हा चित्रपट पाकिस्तानमधील नेटफ्लिक्स प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.चौथ्या स्थानावर सैफ अली खान अभिनीत ‘कर्तव्य’ या क्राईम थ्रिलर चित्रपटाने स्थान मिळवले आहे. थरारक कथानकामुळे हा चित्रपटही गेल्या चार आठवड्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम आहे.
भारतीय चित्रपटांनंतर पाचव्या क्रमांकावर इंग्रजी भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘ऑफिस रोमांस’ आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानेही अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. सहाव्या स्थानावर ‘गोट’ हा स्पोर्ट्स कॉमेडी अॅनिमेटेड चित्रपट असून तो तीन आठवड्यांपासून यादीत आहे.सातव्या क्रमांकावर ‘स्वॅप्ड’ या अॅनिमेटेड फँटसी अॅडव्हेंचर चित्रपटाने स्थान मिळवले आहे. हा चित्रपट सलग सहा आठवड्यांपासून पाकिस्तानच्या टॉप १० यादीत कायम असून त्याची लोकप्रियता अजूनही टिकून आहे.
आठव्या स्थानावर ‘मॉर्टल कॉम्बॅट’ हा मार्शल Netflix Pakistan आर्ट्सवर आधारित चित्रपट असून गेल्या तीन आठवड्यांपासून तो ट्रेंडिंगमध्ये आहे. नवव्या क्रमांकावर अमेरिकन कॉमेडी चित्रपट ‘लेडीज फर्स्ट’ असून यावर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान, दहाव्या स्थानावर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘दोज हू विश मी डेड’ आहे. दिग्दर्शक टेलर शेरिडन यांच्या या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून तो गेल्या दोन आठवड्यांपासून पाकिस्तानमधील नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत आहे.पाकिस्तानमधील या यादीवरून भारतीय चित्रपटांची लोकप्रियता सीमांच्या पलीकडेही कायम असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद हा भारतीय मनोरंजन उद्योगाच्या जागतिक प्रभावाचे द्योतक मानला जात आहे.