गोरेगावच्या भंडगा येथे गांजासह महिला ताब्यात

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गोंदिया, 
Woman detained with cannabis स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात केलेल्या कारवाईत गोरेगाव तालुक्यातील भंडगा येथून 934 ग्रॅम गांजा व मोबाईल असा एकूण 1 लाख 3 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही काररवाई 11 जून रोजी करण्यात आली.
 
 
Cannabis
 
पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वाहतूक करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथक गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना भंडगा येथील एका महिलेकडे गांजाचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भंडगा येथील आरोपी महिला पुष्पा उर्फ मंगला मोतीराम मौजे (वय 52) यांच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशवीत 934 ग्रॅम हिरवा ओलसर गांजा आढळून आला. दरम्यान, पथकाने 93 हजार 400 रुपये किमतीचा गांजा व गांजाच्या व्यवहारासाठी वापरला जाणारा मोबाईल किमत 10 हजार रुपये असा 1 लाख 3 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने सदर गांजा गोंदिया येथील दोन व्यक्तींकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार गोरेगाव पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धिरज राजूरकर, पोलिस हवालदार दिक्षीतकुमार दमाहे, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, महिला पोलिस शिपाई स्मिता तोंडरे व घनश्याम कुंभलवार यांच्या पथकाने केली.