मुंबई,
international film festival राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आयोजित 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) यंदा 15 ते 21 जून दरम्यान मुंबईत पार पडणार असून या महोत्सवात निवडक माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन लघुपटांचे प्रदर्शन होणार आहे. एनएफडीसी संकुलासह विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
महोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील तसेच पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा उपस्थित होत्या. 1990 मध्ये सुरू झालेल्या या द्वैवार्षिक महोत्सवाचे हे 19 वे पर्व असून यंदा जागतिक स्तरावरील चित्रपटसृष्टीतील विविध कलाकृतींचे दर्शन घडणार असल्याचे मगदूम यांनी सांगितले.
यंदाच्या महोत्सवासाठी international film festival एकूण 1459 चित्रपटांची नोंद झाली असून त्यापैकी 144 चित्रपटांची स्पर्धा विभागासाठी निवड करण्यात आली आहे. यात 92 भारतीय आणि 52 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 202 चित्रपट दाखविण्यात येणार असून 46 देशांतील चित्रपटांचा सहभाग असेल. या विभागात ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल्स’, ‘ऑस्कर विजेते चित्रपट’, ‘रेमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह’, ‘एनएफडीसी रिस्टोर्ड फिल्म्स’ आणि ‘इकोज फ्रॉम नॉर्थईस्ट’ यांसारखे विशेष विभाग प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील.महोत्सवातील विशेष आकर्षणांमध्ये ज्येष्ठ ॲनिमेशन दिग्दर्शक रेमंड क्रुमे यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह आणि मास्टरक्लास, तसेच प्रसिद्ध माहितीपट निर्माते सर डेव्हिड अॅटनबरो यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सीक्रेट्स ऑफ वाइल्ड इंडिया’ या विशेष चित्रपटाचे प्रदर्शन यांचा समावेश आहे. यंदा प्रथमच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहकार्याने मराठी माहितीपट व लघुपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या काळात 10 मास्टरक्लास, नॉलेज सिरीज, भारतीय माहितीपट निर्माते संघटनेचा (IDPA) ओपन फोरम तसेच ‘वेव्हज डॉक बाजार’ याचे दुसरे पर्व आयोजित करण्यात येणार आहे. या डॉक बाजारसाठी 155 प्रस्ताव प्राप्त झाले असून निवडक प्रकल्पांना उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शन व व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेऊन एल अँड टी माइंडट्रीच्या सहकार्याने एआय फिल्ममेकिंग हॅकाथॉनही आयोजित करण्यात आली आहे.महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात होणार असून एनएफडीसीच्या पाच प्रदर्शन स्थळांसह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) तसेच बांद्रा आणि विलेपार्ले येथील दोन महाविद्यालयांमध्येही चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये एकूण 18 पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून एकूण पारितोषिक रक्कम 45 लाख रुपये आहे. याशिवाय 10 लाख रुपयांचा प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारही प्रदान केला जाणार आहे.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक international film festival विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले की, यंदा पहिल्यांदाच मराठी माहितीपट व लघुपटांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत असून दादर येथील रविंद्र नाट्य मंदिरात 16 ते 20 जून दरम्यान संध्याकाळी विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक जाणीव, महिला सक्षमीकरण, मानसिक आरोग्य, ग्रामीण जीवन, वारसा आणि मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांवरील चित्रपटांचा यात समावेश आहे.राज्य शासनाने मराठी माहितीपटांसाठीची आर्थिक मदत 10 लाखांवरून 25 लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय गुणवत्तापूर्ण माहितीपट निर्मितीला मोठी चालना देणारा ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई पुन्हा एकदा जागतिक माहितीपट आणि लघुपट संस्कृतीचे केंद्र बनणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.