मुंबई,
A major blow from Tukaram Mundhe राज्यातील अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे अनेक ठिकाणी कारवाया करण्यात आल्या असून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मात्र, तरीही काही भागांत बंदी असलेल्या पदार्थांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.यापुढे गुटखा, पानमसाला आणि निकोटीनयुक्त प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण साखळीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
संघटित पद्धतीने चालणाऱ्या या अवैध व्यवसायाविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. केवळ विक्रेतेच नव्हे, तर उत्पादक, साठवणूकदार, वाहतूकदार आणि वितरण करणाऱ्यांनाही या कारवाईच्या कक्षेत आणले जाणार आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या काही आठवड्यांत राज्यभरात अनेक छापे टाकून भेसळयुक्त आणि प्रतिबंधित माल जप्त केला आहे. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या व्यवसायाविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, या अवैध व्यवहारांमध्ये विभागातील काही अधिकारी सहभागी असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. अशा आरोपांची चौकशी सुरू असून, कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना कोणालाही संरक्षण दिले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, खाद्यपदार्थांच्या विक्रीसंदर्भातही नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरही लक्ष ठेवण्यात येणार असून अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.