adulteration in food वाशीम जिल्ह्यासह मंगरूळनाथ तालुयात दुध, खवा, पनीर, तूप, मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वाढती महागाई आणि नफेखोरीच्या स्पर्धेमुळे काही विक्रेते नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप होत असून अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तालुयात अनेक ठिकाणी दुधामध्ये पाणी, रासायनिक पदार्थ तसेच कृत्रिम घटक मिसळून विक्री केली जात असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे. याशिवाय खवा, पनीर, तूप आणि मिठाईमध्येही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना अशा भेसळयुक्त पदार्थांचा सर्वाधिक फटका बसत आहे. महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना बाजारात मिळणार्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबतही शंका निर्माण होत आहे. वाढत्या किमती मोजूनही शुद्ध अन्नपदार्थ मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अनेक व्यापारी आणि उत्पादक अधिक नफा कमावण्यासाठी भेसळीचा मार्ग स्वीकारत असल्याचा आरोप ग्राहक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासण्या आणि कारवाई होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात भेसळयुक्त पदार्थांची विक्री थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हाभरातील बाजारपेठा, मिठाई दुकाने, दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रे आणि खाद्यपदार्थ उत्पादक यांची नियमित व अचानक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जनतेच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून, प्रशासनाने केवळ नमुने घेण्यापुरते मर्यादित न राहता दोषी आढळणार्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करणे, दंडात्मक कारवाई करणे आणि त्यांची नावे जाहीर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा भेसळीचे हे जाळे आणखी वाढून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोयात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.