शेतकरी-शेतमजुरांच्या मागण्यांवर प्रशासनाशी चर्चा
कारंजा लाड,
bharat Bhagat, hunger striker शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या औरंगपूर येथील शेतकरी नेते भारत पुरुषोत्तम भगत आणि लाडेगाव येथील अण्णा सुरजुसे यांच्या आमरण उपोषणाची शनिवारी १३ जून दुपारी सांगता झाली.
तहसीलदारांनी येत्या १६ जून रोजी आंदोलकांसोबत सविस्तर चर्चा करून मागण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर भगत यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गुरुवार, ११ जूनपासून सुरू झालेल्या या आमरण उपोषणाने तालुयातील शेतकरी व शेतमजुरांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे उपोषणस्थळी कोणत्याही प्रकारचा मंडप किंवा सावलीची व्यवस्था नसताना भारत भगत यांनी तापत्या उन्हात आंदोलन सुरू ठेवले होते.
शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनाशी निगडित प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी, शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव, वाढते उत्पादन खर्च, वाढती महागाई आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुसरीकडे शेतमजुरांनाही रोजगाराची अनिश्चितता आणि वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उपोषणातून करण्यात आली.
तहसीलदारांनी १६ जून रोजी मागण्यांबाबत संबंधित अधिकार्यांची बैठक बोलाऊन चर्चा आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार अनिल वाडेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर, सहायक निबंध कार्यालयाचे सांगळे, राजू आवताडे, डॉ. रमेश चंदनशिव आणि हंसराज शेंडे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
मंगळवारी बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन
वासी नायब तहसीलदार अनिल वाडेकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर यांनी उपोषणकर्त्याशी चर्चा केली. मंगळवारी १६ जून रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात मागण्या संदर्भातील अधिकार्यांची एक बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले. चर्चेदरम्यान मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.