पुणे
Bhimashankar Temple बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराचे दरवाजे अखेर 15 जूनपासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरातील विकासकामांमुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले होते. विकासकामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आल्याने मंदिर प्रशासनाने भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी अधिक मासाची समाप्ती होत असल्याने या योगाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंदिर परिसरातील विविध विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने मंदिर काही महिन्यांपूर्वी बंद केले होते. सुरुवातीला 31 मे रोजी मंदिर भाविकांसाठी खुले होण्याची अपेक्षा होती. मात्र, काही कामे अपूर्ण राहिल्याने उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता 15 जूनपासून मंदिर पुन्हा भाविकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यंदा 17 मेपासून अधिक मासाला सुरुवात झाली होती. या कालावधीत मंदिर बंद असल्यामुळे हजारो भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेता आला नव्हता. त्यामुळे अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी मंदिर खुले होणार असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. या दिवशी जलाभिषेक, पूजा-अर्चा आणि दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात Bhimashankar Temple घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाने अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून मंदिर परिसरात प्रवेश करताना वैध शासकीय ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, संभाव्य गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. 15 ते 30 जून या कालावधीत दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक राहणार असून नोंदणीकृत भाविकांना सकाळी 7 ते 11 या वेळेतच दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल. दररोज जास्तीत जास्त एक हजार भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात बॅरिकेडिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्र तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी गर्दी टाळण्यासाठी आणि सुरळीत व्यवस्थेसाठी निश्चित स्लॉटनुसारच दर्शनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.