* त्यात युवक कल्याणाचा अंशही नाही
*आ. सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात
चंद्रपूर,
'Cockroach Janata Party' युवकांच्या प्रश्नांवर, त्यांच्या कल्याणासाठी पुढे येण्याचा आव आणार्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा खरा उद्देश युवकांचे कल्याण मुळीच नाही, तर केवळ भारतीय जनता पक्ष विरोधी आहे, असा घणाघात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी चंद्रपुरातील पत्रपरिषदेत केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या यशस्वी कार्यपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नीट परीक्षेतील पेपरफुटीची घटना चिंताजनक आहेच. मात्र, अशा संवेदनशील विषयांवर राजकारण करण्याऐवजी त्या पुन्हा घडू नयेत म्हणून प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक आहे आणि त्याद्दष्टीने केंद्र सरकार महत्त्वाची पाऊले उचलत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याविषयी बारीक लक्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही आ. मुनगंटीवार यांनी दिली.
आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या दिल्लीतील आंदोलनातील भाषणांत युवकांना प्रेरणा देणारा, अभ्यासासाठी प्रोत्साहन देणारा किंवा चारित्र्यनिर्माणाचा संदेश देणारा एकही शब्द नव्हता. युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, कौशल्य विकास करावा किंवा राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे यावर मार्गदर्शन करण्याचे सोडून संपूर्ण भाषणाचा केंद्रबिंदू केवळ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गरळ ओकणे हाच होता. यावरून त्यांचा उद्देश कळतो. युवकांच्या नावाने स्थापन झालेली कोणतीही संघटना जर त्यांचे मूळ प्रश्न सोडविण्याऐवजी केवळ राजकीय विरोधाची दुकानदारी चालवत असेल, तर ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. युवकांच्या भवितव्याशी खेळून स्वतःचा राजकीय फायदा लाटण्याचे हे प्रयत्न देशातील जनता चांगल्या प्रकारे ओळखून असल्याचा सणसणीत टोला आ. मुनगंटीवार यांनी लगावला.
काँग्रेसच्या कार्यकाळाची आठवण करून देत आ. मुनगंटीवार म्हणाले, तेव्हा भीषण भोपाळ गॅस दुर्घटनेत हजारो लोकांना जीव गमवावा लागला आणि लाखो लोकांना यातना सहन कराव्या. तरीही तत्कालीन काँग्रेस सरकार दोषींवर कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरले होते. कारखान्याच्या मालकाला विदेशात जाऊ दिले. त्यामुळे केवळ राजकीय पोळ्या भाजण्यापेक्षा झालेल्या चुका भविष्यात टाळणे अधिक महत्त्वाचे आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.