पीडित परिवार मदतीच्या प्रतीक्षेत
रिसोड,
damage in Koyali village काल, १२ जून रोजी झालेल्या सायंकाळी ६ च्या वादळी वार्याने रिसोड तालुयातील कोयाळी बु. येथील गावात प्रचंड नुकसान झाले आहे, अल्पभूधारक शेतकरी राजू महादू वानखडे यांचे संपूर्ण घराचे नुकसान झाले आहे. वार्याचा तडाखा इतका जबरदस्त होता की घरावरील ४० पत्रे उडून गेली आणि घरातील साठवलेला २० पोते गहू पूर्णपणे भिजून नासला.
राजू महादू वानखडे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्याच उत्पन्नावर ते पत्नीसमवेत गुजराण करतात. काल रात्री आलेल्या थैमान वार्याने त्यांच्या घराचे छप्परच उडवले. एकही पत्र शिल्लक राहिले नाही. घरात साठवून ठेवलेला वर्षभराचा गहू पावसात भिजून पूर्णपणे खराब झाला. हातोंडाशी आलेला घासच गेल्याने वानखडे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्याकडे दुसरी कोणतीही शेती नाही. हेच दोन एकर आणि हेच धान्य आमचा आधार होता. आता घरावर छप्पर नाही, खायला धान्य नाही. प्रशासनाने तातडीने पाहणी करून मदत करावी, अशी हात जोडून विनंती आहे असे अश्रू अनावर होऊन राजू वानखडे म्हणाले. त्यांच्या पत्नीनेही सरपंच, ग्रामसेवक,तलाठी यांना तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. कोयाळी बु. सह परिसरातील शेतकर्यांची पिकेही वार्याने झोडपली आहेत. ग्रामस्थांनी वानखडे कुटुंबाचे सांत्वन केले आहे, प्रशासनाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करावा अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.