भंडारा :
Death of a male bear वन्य प्राण्याच्या झुंजित एका नर अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर क्षेत्रात आज 13 रोजी घडली. मृत नर अस्वल हे पाच वर्षाचे असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर परिसरात आज मांडणगाव येथील वनरक्षक ए.सी.हटकर आणि त्यांचे सहकारी नियमित गस्त करीत असताना वन्य प्राण्याच्या विव्हळण्याचा आवाज त्यांना आला. ते आवाजाच्या दिशेने गेले असता रोपवनाच्या टीसीएम नाली जवळील गट क्रमांक 206 नाल्यात त्यांना अस्वल जखमी अवस्थेत विव्हळताना दिसले.
काही वेळाने अस्वलाची हालचाल बंद झाल्यानंतर जाऊन निरीक्षण केले, तेव्हा अस्वल मृत झाल्याचे लक्षात आले. याची माहिती क्षेत्र संचालक पियुषा जगताप, उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक कोका सुहास कांबळे आणि वनपरिक्षेत्राधिकारी सुरज कुमार गोखले यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता अस्वलाच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. आजूबाजूला रक्त आणि शरीराचा काही भाग आढळून आल्याने वन्य प्राण्याशी झुंज होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळाच्या परिसरात वनाधिकाऱ्यांना झुंजीचे निशाणही आढळले. झुंज झाल्याने वनविभागाकडून दुसऱ्या प्राण्याचाही शोध घेतला जात आहे. मृत अस्वलाचे शवविच्छेदन करताना एनटीसीए यांचे प्रतिनिधी म्हणून नदीम खान, शैलेश राजपूत आणि मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून पंकज देशमुख तसेच डॉ. शुभम गुरवे, मेघराज तुलावी व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.