मोदी सरकार म्हणजे विश्वास, विकास आणि जनकल्याणाचा सुवर्णकाळ

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
पत्रपरिषदेत मंत्री डॉ. अशोक उईके

यवतमाळ, 
Dr. Ashok Uike देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षे पूर्ण करत भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ कार्यरत निवडून आलेल्या पंतप्रधानांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच एनडीएची सत्ता देशातील 12 राज्यांमध्ये असून देशातील सुमारे 80 टक्के लोकसंख्या एनडीए शासित प्रदेशांमध्ये राहत असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. शनिवार, 13 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, भाजपाचे नेते देवानंद पवार, नगरसेवक रेखा कोठेकर, जिल्हा महामंत्री राजू पडगीलवार, शंतनू शेटे, दत्ता रहाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
modi
 
यावेळी मंत्री डॉ. उईके पुढे म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यकाळात 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले, 81 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले, तर जनधन योजनेंतर्गत 58 कोटी बँक खाती उघडण्यात आली. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, किसान सन्मान निधी, स्वनिधी योजना, विश्वकर्मा योजना आणि लखपती दीदी अभियानाद्वारे समाजातील विविध घटकांना थेट लाभ देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी गॅस कनेक्शन, सुकन्या समृद्धी योजना, सैन्यात वाढता सहभाग, तसेच 12 कोटी शौचालये आणि 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविणे ही मोठी यशस्वी पावले असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी क्रांती घडवून आणत महामार्ग, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, वंदे भारत ट्रेन, ग्रामसडक योजना, भारतनेट आणि डिजिटल इंडिया यांमुळे भारत अधिक सक्षम आणि आधुनिक झाला आहे, असे मंत्री डॉ. उईके म्हणाले. आर्थिक क्षेत्रात भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून जीएसटी संकलन, यूपीआय व्यवहार, मेक इन इंडिया, सेमीकंडक्टर, मोबाईल उत्पादन, संरक्षण उत्पादन आणि स्टार्टअप क्षेत्रात विक्रमी प्रगती झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक, कलम 370 हटविणे, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, विमानतळ आणि सिंचन प्रकल्प यांसारखे ऐतिहासिक निर्णय व विकासकामे मोदी सरकारच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे मंत्री डॉ.अशोक उईके यांनी यावेळी सांगितले.
मोदीजींच्या नेतृत्वात भारताची आर्थिक झेप
मोदीजींच्या नेतृत्वात आर्थिक क्षेत्रात नवा इतिहास लिहित जीडीपी दरात 7.7 टक्के वाढ झाली आहे. उद्योग क्षेत्र 8.8 टक्क्यांवर पोहोचले. सेवा क्षेत्रात 9.3 टक्के प्रगती झाली आहे. वित्तीय क्षेत्र 10.4 टक्क्यांनी वाढले. उत्पादन क्षेत्र 10.7 टक्क्यांवर भक्कम वाढ झाली आहे. व्यापार वाहतूक क्षेत्रात 11.0 टक्के झेप घेतली आहे.