मान्सूनचा खेळखंडोबा कायम पेरण्यांवर सावट, उष्णतेने महाराष्ट्र कातावला

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
मुंबई
monsoon delay एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 13 जून उलटून गेल्यानंतरही राज्याच्या बहुतांश भागात पावसाने अद्याप ठोस हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पेरण्यांची कामे मोठ्या प्रमाणावर रखडली आहेत.
 

monsoon delay  
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात 15 जून 2026 नंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी पावसाचा अनिश्चित स्वरूपातील खंड आणि काही भागांतच होणारी हलकी व मध्यम सरी यामुळे शेती नियोजनावर परिणाम झाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्पष्ट सूचना देत, अधिकृत सूचना मिळेपर्यंत पेरण्या करू नयेत असे आवाहन केले आहे. दुबार पेरणीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी हे आवाहन करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी शेतकरी परिस्थितीचा अंदाज घेत पेरण्या सुरूच ठेवत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
दरम्यान, राज्यात हवामानातील monsoon delay अस्थिरता वाढताना दिसत आहे. एका बाजूला काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असताना, दुसरीकडे उष्णतेचा कडाका वाढत आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.मुंबई, ठाणे, रायगड आणि अकोला या भागांमध्ये दमट आणि उष्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून महिन्याच्या मध्यावरच वाढलेली उष्णता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून आरोग्यविषयक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.देशातील इतर राज्यांमध्ये मात्र हवामानाचा वेगळाच अंदाज दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह एकूण 17 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही भागांमध्ये ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून जोरदार पावसासह वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मात्र पावसाची प्रतिक्षा अधिकच तीव्र झाली आहे. शेतकरी वर्ग मान्सूनच्या स्थिर आगमनाकडे डोळे लावून बसला असून, पुढील काही दिवस हवामान कसे वळण घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.